दसरा मेळाव्याचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागताच जल्लोष, मध्यवर्ती कार्यालयाबाहेर काय झालं ?

Tv 9 | 1 week ago | 23-09-2022 | 10:05 pm

दसरा मेळाव्याचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागताच जल्लोष, मध्यवर्ती कार्यालयाबाहेर काय झालं ?

नाशिक : शिवसेनेचा (Shivsena) म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा (Dussehra Gathering) कुठे होणार याबाबत मोठी चर्चा होती. पालिकेच्या परवानगी पासून थेट मुंबई उच्च न्यायालयात (High Court) हा वाद गेला होता. अखेर त्याबाबत न्यायालयाने निर्णय दिल्याने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क येथे होण्यास न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. न्यायालयात धाव घेतलेल्या शिंदे गटाच्या विरोधात हा निर्णय गेल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला आहे. नाशिकच्या शालीमार येथे असलेल्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी पेढे वाटत, फटाके फोडत, ढोलताशा वाजवत आंदोत्सव साजरा केला आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे यांच्या बाजूने लागलेला हा पहिलाच निकाल असल्याने मोठा आनंद ठाकरे समर्थकांना झाल्याचे दिसून येत आहे.नाशिकच्या शालीमार येथे शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असून त्याबाहेर शिवसैनिक जमले होते, त्यांनी एकमेकांना पेढे भरवत जोरदार घोषणाबाजी केली.याशिवाय फटाके फोडत, ढोल ताशाचा गजर करत आनंद साजरा करत ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली आहे.आज नाशिकमधील शिवसेना पदाधिकारी मातोश्रीवर गेलेले असतांना शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला असून मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.शिवसेनेचा दरवर्षी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा होत असतो. शिवसैनिकांना दसरा मेळाव्यात शिवसेनेचे विचार पक्षप्रमुख मांडत असतात.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतांना दसरा मेळाव्यात ते विचार मांडायचे, त्यानंतर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या खांद्याकडे ती जबाबदारी आली होती.मात्र, एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी वेगळा गट स्थापन करत आमचीच खरी शिवसेना असा दावा केल्याने शिवसेनेत उभी फुट पडली आहे.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर शिवसेना कुणाची हा वाद न्यायप्रविष्ट होता. मात्र दसरा मेळावा कुणाचा कुठे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने यावर निर्णय दिला असून ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होण्यास परवानगी दिल्याने शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.एकूणच शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे या वादात ठाकरे यांच्या बाजूने लागलेला पहिला निकाल महत्वाचा असल्याने शिवसैनिकांना मोठा आनंद झाला आहे. 

Google Follow Image