Bhandara Crime : भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, फास्ट ट्रॅकवर तपास

Abp News | 5 days ago | 06-08-2022 | 03:12 pm

Bhandara Crime : भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, फास्ट ट्रॅकवर तपास

Bhandara Crime : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच, या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅकवर करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत. भंडाऱ्यात (Bhandara) घडलेलं हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारं असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचं आणि त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही, असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही, हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहेत. काय घडलं?पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती. नुकतीच ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. दरम्यान, 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्यानं तिनं रात्रीच्या सुमारास घर सोडलं. ती गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्याच्या बहाण्यानं ती निघाली. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीनं तिला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं. पण या नराधमानं पुढे तिला घरी सोडलं नाही, तर  गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला तिच्यावर पाशवी अत्याचार केला. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं दुसऱ्या दिवशीही म्हणजेच, 31 जुलैला पळसगाव जंगलात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीनं पळ काढला. पीडिता कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या (आरोपी 2) आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानंतही घरी सोडण्याच्या बहाण्यानं पीडितेवर पाशवी अत्याचार केले. आरोपीनं आपल्या एका मित्राला सोबत घेत 1 ऑगस्ट रोजी पीडीतेला निर्मनुष्य ठिकाणी नेत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. रात्रभर पीडिता असह्य वेदनांनी विव्हळत रस्त्याशेजारी पडून होती. पहाटे गावकऱ्यांनी पीडितेला पाहिलं. विवस्त्र, रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत होती. काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय आल्यानं गावकऱ्यांनी तात्काळ कारधा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला दाखल केलं. वैद्यकीय तपासणीत महिलेवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्यानं भंडारा पोलिसांनी संबंधित गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसाकडे वर्ग केला आहे.  महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Google Follow Image