छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूटला 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी

Abp News | 5 days ago | 05-08-2022 | 04:51 pm

छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूटला 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा (Chota Shakeel) साडू मोहम्मद सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट याला 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. सलीमवर बिल्डरांकडून जबरदस्तीने फ्लॅट विकून पैसे दाऊदला दिल्याचा आरोप आहे. सलीम याला काल अटक करण्यात आली होती. सलीमच्या विरोधात एनआयएकडे पाच बिल्डरांनी आपली बाजू मांडली आहे. एनआयए सलीमच्या खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करणार आहे. सलीमच्या घरात इतर अनेक लोकांच्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. याबरोबरच सलीमच्या घरी लाखो रुपयांच्या विदेशी तस्करीच्या सिगारेट देखील सापडल्या आहेत.सलीमशी संबंधित सुमारे 10000 पानांची कागदपत्रे आहेत. यामध्ये टेरा बाइट डेटाचा समावेश आहे. याबद्दल सलीमची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची कोठडी मिळावी अशी मागणी, एनआयएने केली होती.  कोण आहे सलीम फ्रुट?कौटुंबिक नात्यामुळे सलीम फ्रूट छोटा शकीलच्या अगदी जवळ आहे. छोटा शकील त्याला आपल्या मुलाप्रमाणे वागवतो. छोटा शकीलच्या पत्नीच्या धाकट्या बहिणीशी सलीमचा विवाह झाला आहे. सलीमचे वडील उमर कुरेशी हे मुंबईतील नल बाजार परिसरात फळे विकायचे. त्यामुळे सलीमला सलीम फ्रूट म्हणून संबोधले जाते. या टोळीत सामील होण्यापूर्वी सलीम दुबईला फळे निर्यात करायचा. दुबईमध्ये त्याचा एक आलिशान बंगला देखील आहे. सलीमविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, एनआयएने मुंबईतील माहीम भागातील सुहेल खंडवानी यांच्या घरावर छापा टाकला होता. खांडवानी हे मुंबईतील माहीम दर्गा आणि हाजियाली दर्ग्याचे विश्वस्त आहेत. घरावर छापा टाकल्यानंतर एनआयएचे अधिकारी त्यांना माहीम येथील त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले आणि तेथेही त्यांची चौकशी करण्यात आली.या प्रकरणात  NIA ने अब्दुल कय्युम नावाच्या व्यक्तीची देखील चौकशी करत आहे, जो 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी होता. परंतु, नंतर खटल्याच्या वेळी पुराव्याअभावी विशेष टाडा न्यायालयाने सर्व आरोपातून त्याला निर्दोष मुक्त केले.

Google Follow Image