काँग्रेसमध्येही विरोधाचे सूर, चंद्रकांत हंडोरेंच्या पराभवानंतर अनुसूचित जातीचे नेते राजीनाम्याच्या तयारीत

Abp News | 6 days ago | 22-06-2022 | 12:11 pm

काँग्रेसमध्येही विरोधाचे सूर, चंद्रकांत हंडोरेंच्या पराभवानंतर अनुसूचित जातीचे नेते राजीनाम्याच्या तयारीत

नागपूर : शिवसेनेमधल्या बंडाळीनंतर आता काँग्रेसमध्येही विरोधाचे सूर निर्माण होत आहेत. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानंतर अनुसूचित जातीचे अनेक नेते राजीनामा देण्याच्या मनस्थितीत पोहोचले आहे. धनशक्तीसमोर एका दलित नेत्याचा ठरवून पराभव करण्यात आला, असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.पक्षश्रेष्ठींनी पहिल्या पसंतीचे मत चंद्रकांत हंडोरे यांना द्या, असे आदेश दिल्यानंतरही काही आमदारांनी त्यांचा आदेश झुगारला आणि धनशक्तीचा वापर करुन चंद्रकांत हांडोरे यांचा ठरवून पराभव करण्यात आला. त्यात आमच्या पक्षातील काही लोक जबाबदार आहेत, असा आरोप किशोर गजभिये यांनी केला आहे. पक्षश्रेष्ठींनी या उच्चस्तरीय समितीकडून बेशिस्तीची चौकशी करावी आणि दोषी आमदारांविरोधात कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा देताना केली आहे.विधानपरिषद निवडणूक निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळला. काँग्रेसची पहिल्या पसंतीची तीन मत फुटल्याने पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. तर दुसऱ्या पसंतीचे उमेदवार भाई जगताप हे दुसऱ्या आणि तिसऱ्या मतांच्या फेरीवर विजयी झाले. भाजपचे पाचव्या क्रमांकाचे उमेदवार प्रसाद लाड यांचा दुसऱ्या फेरीत विजय झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल धक्कादायक आहे. चंद्रकांत हांडोरे यांच्या पराभवाने मला दु:ख झालं. निवडणुकीत काहींनी गद्दारी केली. जे काही सत्य आहे ते लवकरच समजेल, असं भाई जगताप म्हणाले होते.विधानपरिषद निवडणुकीचा निकालभाजप : प्रवीण दरेकर (29 मते), श्रीकांत भारतीय (30 मते), राम शिंदे (30 मते), उमा खापरे (27 मते), प्रसाद लाड (28 मते)राष्ट्रवादी काँग्रेस : रामराजे नाईक निंबाळकर (29 मते ), एकनाथ खडसे (28 मते)शिवसेना : सचिन अहिर (26 मते), आमशा पाडवी (26 मते)काँग्रेस : भाई जगताप (26 मते), चंद्रकांत हंडोरे (पराभूत 22 मते) 

Google Follow Image