Patra Chawl Scam : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Abp News | 5 days ago | 05-08-2022 | 06:48 am

Patra Chawl Scam : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Varsha Raut Summoned : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावलं आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावलं आहे. वर्षा राऊत यांना चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी करण्यात आली होती. दरम्यान सध्या संजय राऊत अटकेत आहेत.शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडीने कोठडी सुनावली आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहाराबाबत राऊत माहिती देत नसल्याचा आरोप ईडीनं कोर्टात केला. ज्यांच्याशी व्यवहार झालाय त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचं ईडीनं पीएमएलए कोर्टाला सांगितलं. दरम्यान 1 कोटी 17 लाखाच्या व्यवहाराबाबत तपास सुरु असून यापूर्वी 1 कोटी 6 लाखांच्या व्यवहाराची माहिती मिळाल्याचं ईडीनं कोर्टात सांगितलं. या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीनं समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.संजय राऊत यांच्यावर ईडीने कोणते आरोप केले?शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याशी थेट संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला आहे. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असं ईडीने न्यायालयात सांगितलं. मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले. येस बँक घोटाळा प्रकरणी वाधवान बंधू यांच्यासोबत प्रविण राऊत यांचं नाव आलं असून या प्रकरणीही संजय राऊत यांची भविष्यात ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Google Follow Image