राज्यातील सत्ता पेच आणखी गडद, प्रियंका गांधी मुंबईत; विमानतळावरच काँग्रेस नेत्यांशी खलबतं

Abp News | 3 days ago | 23-06-2022 | 10:10 am

राज्यातील सत्ता पेच आणखी गडद, प्रियंका गांधी मुंबईत; विमानतळावरच काँग्रेस नेत्यांशी खलबतं

Maharashtra Political Crisis : राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामुळे सत्तापेच निर्माण झाला आहे. सरकार कोसळण्याचे ढग आणखी गडद होत आहेत. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेत वादळ निर्माण झालं आहे. अशातच महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत असलेल्या इतर दोन पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. तर काँग्रेसकडून सर्व हालचालिंवर लक्ष ठेवलं जात आहे. अशातच काँग्रेस (Congress) महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) खासगी कामासाठी मुंबईत दाखल झाल्या आहेत. सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीवर प्रियंका गांधी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार असल्याशी माहिती मिळत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणखी वाढत असताना थेट प्रियंका गांधी महाराष्ट्रात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. प्रियंका गांधी आपल्या खाजगी कामासाठी मुंबईहून कनेक्टिंग फ्लाईट घेणार आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडे दोन ते तीन तासांचा अवधी आहे. त्यावेळेत त्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या भेटी-गाठी घेऊन महाराष्ट्रातील सत्ता पेचावर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांना चर्चेसाठी विमानतळावर बोलावलं आहे. चर्चेनंतर त्या आपले पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत खाजगी कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात काँग्रेसचे काही आमदार असल्याची चर्चा रंगली होती. एबीपी माझाशी बोलताना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काँग्रेसचे काही आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी आपल्या आमदरांची जमवाजमव सुरु केली होती. तसेच, सर्व आमदरांशी संपर्क साधला होता. अशातच प्रियंका गांधी यांचा मुंबईतील हॉल्ट आणि त्या दरम्यान काँग्रेस नेत्यांशी केलेली चर्चा ही सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.  दरम्यान, सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागलं. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतंय. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनेतेशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार, पण शिवसैनिकच मुख्यमंत्री व्हावा, असं आवाहन केलं होतं. पण एकनाथ शिंदे मात्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही ठाम असल्याचे दिसून आले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे.  

Google Follow Image