Saamana : 'सामना'च्या संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे; नवी शिवसेना उभारण्यास मदत होणार का?

Abp News | 5 days ago | 05-08-2022 | 06:22 pm

Saamana : 'सामना'च्या संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे; नवी शिवसेना उभारण्यास मदत होणार का?

मुंबई: दैनिक सामनाचे संपादक म्हणून आता उद्धव ठाकरे काम सांभाळणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर रश्मी ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. आता मात्र पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे संपादक पदाची धुरा आल्याने सामना नावाचे शस्त्र वापरून शिवसेना पुन्हा उभी करण्यात त्यांना यश येतं का हे बघावं लागेल. मात्र संजय राऊत यांचे कार्यकारी संपादक पद कायम ठेवण्यात आलं आहे. संजय राऊत यांना ईडी ने अटक केल्यानंतर शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या सामना मुखपत्राचे काय होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले. आज मात्र त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत. कारण सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे घेतली आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर काही महिने त्यांच्याकडेच संपादक पदाची जबाबदारी होती. मात्र त्यामुळे काही राजकीय अडचणी निर्माण होत होत्या. अखेर एक मार्च 2020 पासून रश्मी ठाकरे यांच्याकडे सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी देण्यात आली. सामनाच्या पहिल्या महिला संपादक म्हणून देखील त्यांचे नाव प्रचंड चर्चिले गेले. 1990 च्या दशकात आपली राजकीय भूमिका, विचार महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या दैनिकाची सुरुवात केली. 23 जानेवारी, 1989 रोजी मध्यरात्री ‘सामना’ दैनिकाची सुरुवात झाली. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले.“हिंदुत्वाचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि दररोज होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी, सामना हे नवे शस्त्र असेल आणि उद्या पाळी आली तर, आम्हाला खऱ्या शस्त्रालाही हात घालावा लागेल” असे प्रकाशना प्रसंगी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.‘या असे सामन्याला’ हा सामनाचा पहिला अग्रलेख होता. त्यानंतर बाळासाहेबांच्या मृत्यूपर्यंत तेच सामनाचे संपादक होते. त्यानंतर पक्षाप्रमाणेच मुखपत्राची जबाबदारी देखील उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली आणि बाळासाहेबांनंतर शिवसेनेची आणि स्वतःची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी सामनाचा वापर त्यांनी केला. याचवेळी कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत यांनी देखील बरीच वर्षे हे पद सांभाळले. सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर टीकेचे आसूड खऱ्या अर्थाने संजय राऊत यांनीच ओढले. त्यामुळे फडणवीस सरकार सोबत असताना आणि त्यानंतर महाविकास आघाडी सोबत असताना देखील सामना मधील अग्रलेखांची चर्चा अक्षरशः रोज केली जायची आणि त्यावरून महाराष्ट्राचे राजकारण ठरायचे. बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दैनिक सामना या शस्त्राचा वापर संजय राऊत यांनी प्रभावीपणे केला. मात्र त्यामुळे त्यांच्यावर ईडी ची कारवाई झाली असे म्हटले जात आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत केलेल्या सत्ता स्थापनेत देखील सामनाची मोठी भूमिका होती. देशभरातल्या माध्यमांचे लक्ष सामन्यातील अग्रलेखांकडे असायचे आणि आताही असते. कितीही नाही म्हटले तरी सामनाच्या अग्रलेखांची दखल ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातील नेत्याला घ्यावीच लागते. त्यामुळेच शिवसेना म्हणजे सामना आणि सामना म्हणजे शिवसेना हे समीकरण आता पूर्णत्वास आले आहे. पण आता संजय राऊत नाहीत. एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झिडकारून शिवसेना फोडली असताना उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा शिवसेना उभी करावी लागणार आहे. यासाठी सामना या शस्त्राचा ते कसा कौशल्यपूर्ण वापर करतात हे बघणे औत्सुक्याचे आहे.   

Google Follow Image

Latest NewsMAHARASHTRA WEATHERMAHARASHTRA WEATHER