Sangli Crime : सांगली जिल्हा हादरला! एकाच दिवशी दोन हत्या, एकाला प्रेमसंबंधातून तर दुसऱ्याला जुन्या वादातून संपवलं

Abp News | 5 days ago | 05-08-2022 | 08:11 am

Sangli Crime : सांगली जिल्हा हादरला! एकाच दिवशी दोन हत्या, एकाला प्रेमसंबंधातून तर दुसऱ्याला जुन्या वादातून संपवलं

Sangli Crime :  सांगली जिल्ह्यामध्ये काल दोन हत्यांच्या (Sangli Murder) घटना घडल्यानं जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी दोन हत्यांच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. एक हत्या प्रेमसंबंधातून तर दुसरी दोन गटातील जुन्या वादातून झाली आहे. अनैतिक संबंधातून कर्नाटकातील एका तरूणाचा सलगरे गावच्या हद्दीत खून झालाय तर दुसरीकडे तासगाव शहरात जुन्या भांडणाच्या वादातून एकाचा रात्री खून करण्यात आला आहे. सलगरे खून प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीसांनी दोघा संशयितांना अटक केली असून दोघे जण फरार झाले आहेत. तर तासगावमधील खून प्रकरणी पोलीस हल्लेखोराच्या शोधात आहेत.अनैतिक संबंधातून कर्नाटकातील अथणी तालुक्यातील अरळहट्टी येथील संदीप आवळेकर (वय 33) या तरुणाची सलगरे गावच्या हद्दीत हत्या झाली. हा तरुण सलगरे येथील रूग्णालयात उपचारासाठी आला होता. उपचारानंतर रात्री दहा वाजणेच्या सुमारास मित्राच्यासोबत अरळहट्टी गावी दुचाकीवरून निघाला असताना  मागून आलेल्या दुचाकीवरील इसमांनी कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तो जखमी  होऊन दुचाकीवरून खाली कोसळला. जखमी अवस्थेत गावच्या दिशेने पळत निघाला असता दगडाला ठेचकाळून खाली पडल्यानंतर हल्लेखोरांनी पुन्हा कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलीसांचा प्राथमिक अंदाज असून अटक करण्यात आलेल्यांकडून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे पोलीसांनी सांगितले.या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीसांनी आकाश जाधव (रा. अरळहट्टी) आणि रामू इंगळे (रा. जकरहट्टी) या दोघांना अटक  केली आहे. तासगाव शहरात दोन गटातील  जुन्या भांडणाच्या वादातून एकाचा खून करण्यात आला आहे. तासगाव मधील ढवळवेस भागामध्ये ही घटना घडली असून यात तासगाव मधील शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष अनिल बाबासाहेब जाधव(वय 50) यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज  तासगाव शहर बंदची हाक देण्यात आली आहे. सदर बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळ्यात आल्या असून सदरचा बंद शांततेत पार पाडावा असे आवाहन शिवनेरी कला, क्रीडा मंडळाकडून करण्यात आलंय. तासगाव शहरात ढवळवेस येथे दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून दोन गटात वादावादी झाली होती. याच वादातून गुरुवारी दुपारी पुन्हा या दोन गटांतील कार्यकर्त्यांत वाद झाला. दुपारच्या सुमारास कोकणे कॉर्नरजवळ दोन गटांतील तरुणांत किरकोळ हाणामारी झाली होती. त्यानंतर पुन्हा या दोन गटांतील वाद उफाळला गेला. सायंकाळपर्यंत दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ल्याची तयारी सुरू होती. मात्र सायंकाळी सातच्या सुमारास पाऊस पडू लागल्यानंतर गर्दी पांगली गेली. अनिल जाधव यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते निघून गेले होते. त्यानंतर काही वेळातच सुमारे पन्नासहून अधिक तरुणांच्या जमावाने ढवळवेसमध्ये प्रवेश करून अनिल जाधव यांच्यावर घरापासून काही अंतरावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला केला. हल्ला करून हल्लेखोर लगेचच पसार झाले. हल्ल्यानंतर जाधव रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. नातेवाईक आणि जवळच्या लोकांनी त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट दिली. दखाखान्याबाहेरदेखील जाधव यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. शहरात तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

Google Follow Image

Latest NewsMAHARASHTRA WEATHERMAHARASHTRA WEATHER