सदा सरवणकर गद्दार, बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक, मुंबईत बॅनरला काळं फासलं

Abp News | 4 days ago | 23-06-2022 | 01:30 pm

सदा सरवणकर गद्दार, बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक, मुंबईत बॅनरला काळं फासलं

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी करुन एकनाथ शिंदे गटात सामील झालेले आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दादर-माहिम मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर यांचा गद्दार असा उल्लेख करत शिवसैनिकांनी त्यांच्या बॅनरला काळं फासलं. शिवसेनेची माहिममधील शाखा क्रमांक 188 बाहेर मिलिंद वैद्य यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी सदा सरवणकर यांच्या फोटोला काळं फासून गद्दार असा उल्लेख केला.एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केला. त्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसत आहे. शिवसेनेचे आणखी सात आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यापैकी सदा सरवणकर यांच्यासह काही आमदार आज गुवाहाटीत दाखल झाले आहेत.सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. मुंबईतील शिवसेना आमदार कट्टर असून ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाहीत असा विश्वास होता. परंतु मुंबईतील तीन आमदार आज गुवाहाटीमध्ये पोहोचले आणि हे चित्र बदललं.दोन दिवसांपूर्वी बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन, आज गुवाहाटीत दाखलएकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील वातावरण दोन दिवसांत कसं बदललं हे मुंबईतले दादर-माहिमचे आमदार सदा सरवणकर यांच्या भूमिकेवरून दिसून येत आहे. बंडानंतर एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांविरोधात मंगळवारी (21 जून) आंदोलन करणारे सदा सरवणकर आज (23 जून) गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. उद्धवसाहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देणाऱ्या सदा सरवणकर यांनी अवघ्या काही तासांत बाजू बदलून शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे राजकारण बेभरवशाचं असतं म्हणतात त्याचा प्रत्यय या निमित्ताने आला.शिवसेनेचा 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे कायदेशीर लढाई लढवण्याची शक्यताबंडाचं निशाण फडकावल्यानंतर एकनाथ शिंदेंकडे जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढतानाच दिसत आहे. आज आणखी काही आमदार शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. शिंदे यांच्यासोबत सध्या 40 च्या वर आमदारांची संख्या आहे. हे सगळं सुरु असताना 'मूळ पक्ष' म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचा 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदेंच्या गोटात असल्याची माहिती समोर येत आहे. 'मूळ पक्ष' म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदेंचे प्रयत्न आहेत, अशी माहिती आहे. यासाठी भाजपची टीम मदत करत असल्याची देखील माहिती आहे. आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पत्र सादर केल्यानंतर शिंदे सत्तास्थापनेचा दावा करतील अशी माहिती मिळतेय.

Google Follow Image