सत्ता येते, सत्ता जाते, समीकरण बदलत असते, पण.... अजित पवारांचा शिंदे सरकारला टोला

Abp News | 5 days ago | 05-08-2022 | 07:55 pm

सत्ता येते, सत्ता जाते, समीकरण बदलत असते, पण.... अजित पवारांचा शिंदे सरकारला टोला

पुणे : नवीन सरकारने अनेक  कामांना स्थगिती दिली. परंतु, पुणे जिल्ह्यातील कामांना खीळ बसणार नाही यासाठी प्रयत्न करू. एक महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. सत्ता येते, सत्ता जाते, समीकरण बदलत असते. सत्ता आली म्हणून हुरळून जायचं नसतं आणि सत्ता गेली म्हणून नाउमेद व्हायचं नसतं असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.  बारामती तालुक्यातील मोरगावमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला अजित पवारांनी उपस्थित होते. यावेली त्यांनी रखडलेल्या मंत्रिंडळ विस्तारावरून आणि नव्या सरकारने कामांना स्थगिती दिल्यावरून शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.  अजित पवार म्हणाले, "मी 7 वेळी निवडून आलो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. माझ्याकडे अर्थ खाते होतं. कोरोना काळात चांगलं काम केलं. सगळ्याना चांगला निधी दिला. मोरगाव मध्ये पाच कोटींची कामे केली. माझ्या तालुक्यात 112 गावं आहेत. त्यात मोरगावला जास्त निधी दिला." "पेट्रोलच्या किमती वाढल्या म्हणून लोकांनी डिझेलवरच्या गाड्या घेतल्या. आता परत डिझेलचे दर वाढले. अच्छे दिन म्हणत होते.  आता सीएनजीचे दर पण वाढत आहेत. आता इलेक्ट्रॉनिक वाहने आली. इथेनॉलवर ट्रॅक्टर देखील चालायला लागले आहेत. आता नवनवीन बदल व्हायला लागले आहेत, असे अजित पवार म्हणाले.   अजित पवार यांना यावेळी नीरा रस्त्याची दुरवस्था झाली आहे असं एकाने निवेदन दिलं. यावर अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली. निवेदन दिल्यानंतर अजित पवार म्हणाले, जरा दम काढा ना. त्यावर कार्यकर्ता म्हणाला दादा काम हळू आहे. त्यावर अजित पवार म्हणाले कॉन्ट्रॅक्टर तू नाहीये ना. नाहीतर विमानाच्या वेगाने रस्ता झाला असता. जेव्हा चांगली काम करतो तेव्हा म्हणत जा काम केलं म्हणून, हुरूप येतो काम करायला. सारखं राहिलेलं सांगत असता. बारामती बँकेत कामाला असलेल्या एका कर्मचाऱ्याने बदलीबाबत अजित पवार यांना यावेळी निवेदन दिले. "दादा 9 वर्ष बाहेर काढली आता बारामतीत बदली करा, आता शाखा राज्यभर आहेत, असे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले यावर अजित पवार म्हणाले, "सगळ्यांना बारामती कसं देता येईल? बाहेर काम करायची तयारी पाहिजे. नशीब म्हणाला नाही की दादा बसून पगार द्या. केरळचे लोक दुबईला जाऊन कमं करतात. 

Google Follow Image