Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे- शरद पवार भेट, एक तासाहून अधिक वेळ खलबतं, 'मातोश्री'वर शक्तीप्रदर्शन सुरू

Abp News | 2 days ago | 22-06-2022 | 08:20 pm

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे- शरद पवार भेट, एक तासाहून अधिक वेळ खलबतं, 'मातोश्री'वर शक्तीप्रदर्शन सुरू

मुंबई: राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते. ही बैठक एक तासाहून अधिक काळ सुरु होती, पण त्यामध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समजलं नाही. दरम्यान, मातोश्रीवर शिवसैनिक जमा होत होत असून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीची एक बैठक झाली. त्यामध्ये शरद पवार यांनी प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर काँग्रेसचे नाना पटोले हेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. तोंडावर येऊन सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना संदेश दिला आहे. त्यानंतर आता मातोश्रीसमोर शिवसैनिकांची गर्दी होत असून त्या ठिकाणी सेनेच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री?उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला आज दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, तर समजून घेतलं असतं. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं....सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन सांगावं.... तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको असं तोंडावर सांगावं. मी आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो... जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. ही लाचारी नाही, मजबुरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत... तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारेन."पक्षप्रमुख म्हणून मी राजीनामा द्यायला तयारउद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "ज्या शिवसैनिकांना वाटतंय की मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे... त्यानी मला थेट सांगावं. हेही पद सोडेन. मी मुख्यमंत्रीपदी असल्याने जर कुणाला अडचण असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडणार.... माझ्यानंतर जर कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे."

Google Follow Image