उद्धव ठाकरे गटाची भूमिका चुकीची, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचं : एकनाथ शिंदे

Abp News | 2 days ago | 24-06-2022 | 09:24 am

उद्धव ठाकरे गटाची भूमिका चुकीची, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचं : एकनाथ शिंदे

Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा पूर्ण झाला आहे. मात्र अद्याप सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय झालेला नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः एबीपी माझाशी (ABP Majha) बोलताना दिली आहे. काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सध्याच्या घडामोडी, पुढची भूमिका यांबाबत चर्चा केली. त्यावेळी 12 आमदारांना अपात्र ठेवण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेला (Shivsena) एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. तसेच आकडे महत्त्वाचे असतात, असं म्हणत त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रतिक्रियेला देखील उत्तर दिलं आहे. "आपल्या पाठिशी महाशक्ती आहे. त्यांनी पाकिस्तानला वठणीवर आणलं. आपल्याला काहीही कमी पडणार नाही. आपल्या सर्वांचं सुखदु:ख आता एकच असून, सारे एकजुटीनं राहू", असं एकनाथ शिंदे काल बंडखोर आमदारांच्या बैठकीत म्हणाले होते. यातील महाशक्ती कोण आहे असं विचारल्यावर महाशक्तीचा जो उल्लेख केला गेला, ती महाशक्ती बाळासाहेब ठाकरे यांची शक्ती आहे. जी वेळोवेळी आम्हाला मदत करेल, असं एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या गटाची भूमिका चुकीची आहे. अशी कोणतीही कारवाई करता येत नाही. बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे म्हणून आमदारांचं निलंबन केलं जावं, असं देशात कोणतंही उदाहरण नाही. आमच्याकडे संख्याबळ आहे. अर्थातच ते संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे. महाशक्तीचा जो उल्लेख केला गेला, ती महाशक्ती बाळासाहेब ठाकरे यांची शक्ती आहे. जी वेळोवेळी आम्हाला मदत करेल.", असं शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी एक्स्ल्युझिव्ह बातचित करताना एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली. खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेंची की, एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांची? या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, असा कोणताही दावा केलेला नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक. आमच्याकडे संख्याबळ आहे. आज आणखी एक बैठक होणार आहे. त्यानंतर आणखी काही गोष्टी पुढे स्पष्ट होतील."शरद पवारांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना बाहेर गेलेल्या आमदारांना परत यावंच लागेल, असं म्हटलं, त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण लोकशाहीत शेवटी आकडे महत्त्वाचे असतात. लोकशाहीत कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे जे आहे, तेच करावं लागतं. त्यामुळे मला याबद्दल जास्त बोलायची गरज नाही. नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे आमची बाजू भक्कम आहे."दरम्यान, सध्या गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलमधून राज्यातील राजकीय बंडाची रणनीती ठरवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटाची ताकद वाढतानाच दिसतेय. आमदार मंत्री शिंदेंच्या गटात सहभागी होत असतानाच आता शिवसेनेतले अन्य बडे नेतेही एकनाथ शिंदेंच्या समर्थनात पुढे येतायत. राज्यातील काही माजी आमदार गुवाटीकडे रवाना झाल्याची माहिती मिळतेय. शिवसेनेसोबत बंड करणाऱ्या या मोठ्या नेत्यांची प्रामुख्यानं महाविकास आघाडीतून बाहेर पडावं ही मागणी आहे. राष्ट्रवादीमुळे ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद कमी होतेय असंही या नेत्यांचं म्हणणं आहे.

Google Follow Image